नियमबाह्य प्रवाशांची वाहतुक थांबवावी : करवे - युवाराज्य न्युज

news_496

सदलगा येथे जादा बसेसच्या मागणीचे निवेदन

युवाराज्य न्युज : सदलगा

सदलगा येथे अनेक शाळा, महाविद्यालये असल्याने येथे दररोज शेकडो विद्यार्थी बाहेरगावातुन येत असतात. तर येथील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी चिकोडी, एकसंबा या ठिकाणी दररोज जात असतात. येथील सुमारे ६०० हुन अधिक स्थानिक विद्यार्थांना पास वितरीत करण्यात आले आहेत. मात्र येथे पुरेशी बस व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी त्वरीत जादा बसेसची सोय करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन कर्नाटक रक्षण वेदिकेच्या सदलगा विभागाकडुन सलगा बस स्थानक नियंत्रकांना देण्यात आले.

शासनाच्या नियमानुसार परिवहन संस्थेच्या बसेसमधुन प्रत्येकी ६४ प्रवाशांची वाहतुक करणे बंधनकारक आहे. मात्र पासधारक विद्यार्थ्यांची संख्या आणि प्रवाशी संख्या पाहता उपलब्ध असणाऱ्या बसेस अत्यल्पच आहेत. परिणामी विद्यार्थांना दररोज बसमधील गर्दीच्या चेंगराचेंगरीत बसमध्ये चढणे, शाळा, महाविद्यालयांपर्यंतच्या थांब्यापर्यंत बसला लोंबकळत जावे लागत आहे. वेळेवर पोहचण्यासाठी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घाईगडबडीत जीवघेणा खेळ दररोज सुरु आहे. या प्रकाराला त्वरीत आळा घालणे गरजेचे आहे. मात्र याकडे आगार प्रमुखांचे दुर्लक्षच होत असल्याने विद्यार्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदरच्या परस्थितीमुळे विद्यार्थी प्रवाशी वर्गाला अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. प्रसंगी अशा प्रकाराला सामोरे जावे लागल्यास त्याला आगार प्रमुखच जबाबदार आहेत अशा आशयाचे निवेदन सदलगा येथील बसस्थानक नियंत्रक बडीगेर यांच्याकडे देण्यात आले.

यावेळी करवे सदलगा विभाग अध्यक्ष संजु लठ्ठे, वैभव पाटील, अमित हणबर, सचिन कोल्हापुरे, आशुतोष लोकरे, ओंकार सरवडे यांच्यासह शेकडो विद्यार्थी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या ही परिसरातील, बातम्या, जाहिराती, तुमचे लेख पाठविण्यासाठी आम्हाला 7028140801 या Whats app क्रमांकावरती संपर्क करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्‌ससाठी लॉग इन करा www.yuvarajyanews.com

28-Jul-2018सदलगा Yuvarajya News Network
Top