काळ आला होता पण ....... वेळ - वाचा हृदयस्पर्शी कथा

news_621

आनंदा तुकाराम बरगुले ९९७५८७३५६९

शिवार हिरवागार दिसू लागला होता. डोंगर कड्या-कपारीतून हिरवं गवत आपली तोंडं वर काढू लागलं होतं. आभाळ सारखं भरून येत होतं. मध्येच वार्‍याची गार झुळूक येऊन जात होती. अंगाला हा गारवा किंचितसा बोचत होता. वातावरण कसं अगदी मनमोहक झालं होतं. लोकं पेरण्या करू लागले होते. तलावात पाणी भरू लागलं होतं. मागच्यावर्षी पावसानं हुलकावणी दिली होती पण ह्यावेळी मात्र लवकर हजेरी लावली होती.

गणपानं कासरा हातात घेतला. बैलांना वैरण टाकण्यासाठी त्यानं गंजीवरनं वाळलेल्या वैरणीची एक पेंडी कुर्‍हाडीनं कचा-कचा तोडली आणि पाखर्‍या व सोन्याच्या पुढं दावणीत जरा जरा त्यातील वैरण टाकली व रानातील ओली वैरण काढण्यासाठी तळ्याकडंच्या रानाकडं जाण्यासाठी त्यानं पायात चपला अडकवल्या. गळयातला टॉवेल सरळ करत तो रानाकडंच्या रस्त्यानं चालू लागला. आज बैलांना विश्रांती द्यायची असं मनाशी त्यानं ठरविलं होतं. कालपर्यंत बैलांनी बरीच मेहनत घेतली होती. रानातल्या मेहनती पासून ते पेरण्या होईपर्यंत बैलांना उसंत अशी नव्हती. पाखर्‍या आणि सोन्याची जोडी म्हणजे गणपाचा जीव की प्राणच होता. बैलांच्या अवतीभवतीच त्याचा दिस कधी जायचा ते कळायचं नाही. त्यात पाखर्‍या हा मारका बैल असल्यामुळं त्याला वैरण पाणी करायला कोणीच पुढं धजावत नव्हतं. गणपाशिवाय त्याच्या पुढं कोणी गेलेलं त्याला खपत नव्हतं आणि कोणी धाडस करून गेलंच तर त्याला पाखर्‍याच्या शिंगाचा तडाखा बसल्याशिवाय राहात नव्हता. गणपासुध्दा नवी कापडं घातली की त्याच्या समोर जायला धजत नव्हता. कारण असंच एकदा तो नवी कापडं घालून परगावी चालला होता. गडबडीत बैलांना वैरण टाकावी म्हणून वैरण घेऊन दावणीजवळ गेला तोच पाखर्‍यानं जोरात ढुशी दिली तसा तो मागं पडला. पाखर्‍याचं शिंग घुसता-घुसता वाचलं होतं. डाव्या बगलेवर त्याचा ओरखडा उठला होता…. पण गणपानं त्याला काही न करता गपचीप गावाची वाट धरली. त्याचा ही पाखर्‍यावर लई जीव होता. पोटच्या पोरागत तो त्याला जपायचा. कालच सुतारकीतल्या रानाची पेरणी गणपानं संपविली होती. त्यामुळं आज जरा निवांत वाटत होतं. आता फक्त पावसाची येण्याची वाट तो पहात होता. विचार करत-करत तो ओढा ओलांडत होता. ओढ्यात थोडंस पाणी साचलं होतं. पाऊस जास्त झाला की, ह्या ओढयातून पलीकडं जाणं लईच अवघड काम होऊन जात होतं. आज पाऊस पडण्याची चिन्ह दिसत होती. लगबगीनं पाऊलं उचलत तो चालत होता. येताना भाकरी तरी घेऊन आलो असतो असं त्याला वाटत होतं कारण पावसानं गाठलं तर त्याला वेळ लागणार होता. त्यात तळयाकडंचं रान म्हणजे एक-दीड कोस तरी दूर होतं. शालीसंगं सकाळीच किरकोळ वाद झाल्यामुळं तो गडबडीतच आज घरातून निघाला होता. एरवी तो बैलगाडी घेऊनच तळयाकडंच्या रानात जायचा पण आज असंच विचारामध्ये तसाच आला होता. त्यात आज त्यानं मनाशी ठरवलं होतं की, आज बैलांना विश्रांती द्यायची. पण बैलाबरोबर राबणार्‍या गणपाला कोण विश्रांती देणार... स्वत:ची जणू त्याला फिकीरच नव्हती. काबाडकष्ट करायची सवयच झाली होती. राब-राब राबायचं आणि शेवटी पाऊस पाणी व्यवस्थित झाला तर बरं! नाहीतर तसंच गरीबीतचं दिवस काढायचं. हे त्याच्या जीवनाचं गणितच बनलं होतं. घरात तीन पोरी एक सर्वात लहान पोरगा. लई दिसानं झालेला हा पोरगा, त्याचं नाव त्यानं दौलू ठेवलं होतं… दौलूनंच आपल्याला काय शिकून सुख लावलं तर लावलं असं त्याला वाटायचं .
रान जवळ आलं होतं. गणपानं गळयातला टॉवेल काढून हातात घेतला. कासरा खाली जमिनीवर पसरून टाकला आणि विळा घेऊन त्यानं मक्याच्या रानातील कणसं भरलेली ताटं काढू लागला. बघता-बघता एक भाराभर वैरण काढली. बरोबर जरा गवत घ्यावं म्हणून तो रानातून मक्याचा कवळा घेऊन बाहेर आला. बांधावर उभा राहुन बघू लागला तर वरच्या बांधावर गवत जास्त वाढल्यागत वाटत होतं. मग तसाच तो तडक वरच्या बांधाकडं गेला व कराकरा गवत कापू लागला . तेवढ्यात पाऊस वाजल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. पावसाची मोठी सर आली होती. रफ... रफ... रफ... रफ... असा आवाज घुमू लागला. लगबगीनं त्यानं कापलेलं गवत गोळा करून कवळ्यात घेतलं व बांधवर टाकलेल्या मक्याच्या भार्‍यावर आणून टाकलं . तवर पावसानं चांगलाच जोर धरला होता. अंगावरची कापडं सारी भिजून चिंब झाली होती. काही मिनिटातच पावसाच्या झडीनं गणपाला चांगलंच झोडपून काढलं होतं. आता पाऊस उघडण्याची वाट बघावी का...? की, पावसातच घराकडं जावं...! ह्या ईचारातच गणपा होता. जास्त वेळ थांबलो आणि पाऊस नाही उघडला तर ओढा पार करणं अवघड आहे. असा विचार करून त्यानं भर पावसातच जायचं ठरवून वैरणीचा बिंडा करकचून आवळून बांधला व उचलण्यासाठी भार्‍याखाली हात घातला तर भारा कुठं उचलतोय... पावसानं भिजल्यामुळं भार्‍याचं वजन चांगलच वाढलं होतं. तसंच त्यानं ताकतीनं भारा कण्हत-कण्हत उचलला व पाठीवरील टॉवेल सरळ करत खांद्यावर टाकला व चिखलातून जपून पाय टाकत तो घराच्या दिशेनं चालू लागला. रस्ता पूर्ण पाणी व चिखलानं राड झाला होता. कुठं कुठं घसरट झाली होती. त्यातनच आबदार पावलं टाकत चालणं गणपाला भागच होतं. वरनं पावसाचा मार बसत होता. चिखलातून चालताना चपला अडकत होत्या . असं करत करत गणपानं ओढा पार केला . निम्म अंतर पार केल्यासारखं त्याला वाटत होतं. त्यात वैरणीचा भार जास्तच वाटू लागला होता. पण जनावरांना वैरण घेऊन जाणं भाग होतं. घराजवळची रानं नुकतीच पेरली होती त्यामुळं दुसरीकडं वैरण मिळणं कठीण होतं... झटक्यातच त्यानं खांद्यावरचा भारा आपटला त्याबरोबर टावेल भार्‍यासंगच खाली पडला. तो उचलत त्यानं वैरणीच्या भार्‍यात खोवलेला विळा काढुन घेतला व तडक घरात घुसला.
शालीचा राग अजून मावळला नव्हता. गणपानं घरात जावून भिजलेली कापडं बदलून टाकली व दौलूला हळूच बोलला … “आरं... च्या करायला सांग आईला…”
“व्हय सांगतू की, पण तुमी पावसात कशाला गेलता...?”
“आरं मग वैरण कोणी आणायची...?”
तवर दौलू आई जवळ जावून च्या कर म्हणून बसला…
शालीन काही न बोलताच चहाचं पातेलं खंगाळून तीनं ते चुलीवर ठेवलं. बाहेर पावसाचा जोर जरा कमी झाला होता. गणपा बैलांना वैरण टाकण्यासाठी बाहेर गोट्याजवळ आला. पाखर्‍या व सोन्या वाटच बघत बसली व्हती. गणपा दिसल्याबरोबर दोघंही ताडकन उठून उभी राहिली. गणपानं वैरणीचा भारा सोडून त्यातली दोन पेंडया होईल एवढी वैरण काढली व दोघांपुढं जरा जरा टाकली. पाखर्‍या व सोन्या मुंडी हलवत दावणीतील वैरण खावू लागले. गणपा समाधानानं त्यांच्याकडं बघत होता. थेाडावेळ थांबल्यावर दौल्याची हाक ऐकू आली. भाऊ चहा प्यायला या. दौलू गणपाला भाऊ म्हणायचा.
दुपार टळून गेली होती. घरात जाऊन तो चहा पीत असताना त्याचा बा सिदगोंडा आतल्या खोलीतून बाहेर आला. त्याचं वय झालं होतं पण म्हातारं लई हिकमती... आपलंच खरं म्हणायचं. गणपा द्राक्षाची बाग लावायची म्हणत होता. पण म्हातार्‍याचा त्याला विरोध होता. दौलूनं म्हातार्‍याला बी चहा दिला. सिद्दू म्हातार्‍यानं गणपाला विचारलं, “आज काय काम न्हाय वाटतं...?”
त्याचा खोचक भाव ऐकून गणपा म्हणाला, “आवो दादा सारखं काय काम -काम करत बसायच काय...? मुक्या जनावरांस्नी काय विसावा नगो का...?”
म्हातारं हे ऐकून गप् बसलं. गणपा पारबर बसला व जेवण करून तो उठला व रानातून फिरून यावं म्हणून तो घरामागच्या रानाजवळ आला. पाऊस आता ओसरला होता. बारीक झिरमाट येत होतं. गणपा रानाकडं बघत-बघत तो पोरीच्या लग्नाचा विचार करत होता. थोरली पोरगी आता लग्नाला आली होती. लग्न करायची म्हटलं तर खर्च आलाच की, म्हातार्‍याला म्हणतोय बाग घालतो तर त्योबी नगंच म्हणतोय... काय करावं कसं सांगाव म्हातार्‍याला, पैसा तर कसा मिळंल... कोकुटनूरची जत्रा बी जवळ आलीय... आपल्याला गेलंच पाहीजे... दरवर्षी आपून जातोयच...! धोंडामावशीचाबी निरोप आला होता. ती बी देवाला येणारच हाय... बैलगाडी किती तारखेला जाणार ईचारत होती. गावात सगळयात पुढं आपलीच गाडी असत्या आणि कोणं पुढं गेलाच तर आपला पाखर्‍या-सोन्या कोणाला पुढं जाऊन देणार हाय...! असं विचार करत तो घराकडं फिरला... दिवस उतरणीला लागला होता. ढगामुळं दिसत नव्हता पण मावळतीला आल्यासारखं वातावरण वाटत होतं. गणपानं पाखर्‍या व सोन्याला पानी दावलं व पुन्हा वैरण टाकून तो घरात येऊन बसला.
अंधार पडू लागला होता. पावसाची रिपरिप आता पूर्ण थांबली होती. दौलू व त्याच्या तिन्ही बहिणी अभ्यास करत बसल्या होत्या. मध्येच बोलण्याची कूरबूर ऐकू यायची. गणपा सतरंजीवर पाय सरळ करून बसला. शालीनं जेवण तयार केलं होतं. जेवायला बसल्यावर म्हातार्‍यानं विषय काढला, “आरं बाग लावणं आपल्याला न्हाय जमायचं...! त्याला लई पैसा लागतूय. आपलं हाय तेच बराय…”
“दादा... कर्ज काढूयाकी जरा. काय होतंय एवढं...?”
“होतंय काय डोंबाल पण नगंच ते आपल्याला…”
“मग कशाला विषय काढताय...?”
थोडावेळ शांतता पसरली तवर शालीनं विषय काढला, “मला माहेरला जायचंय...!”
“का?...”
“का म्हणजे?...”
“आता झाली की पेरणी... आता तर जाऊन येते की...”
“तुमी काय मला सुखानं राहू देऊ नका...”
“का? काय तुला फासावर चढवलंय व्हय…?”
“व्हय आता तेवढंच राहीलंय...”
“काय म्हटलीस...बसा आता तुमी सगळे जातो मीच कुठंतरी घर सोडून...”
यावर सगळे शांत झाले. कोणी कुणाबरोबर बोलत नव्हतं. गणपा रोजच्या वादाला कंटाळला होता. कोणीच त्याचं मन समजून घेत नव्हतं. काय करावं काय...? असं विचार करत तो ताडकन उठला व गोठ्याजवळ गेला. पाखर्‍या-सोन्या रवंथ करत बसली होती. त्यांना वैरण टाकली. त्यांच्या पाठीवरनं हात फिरवत बोलू लागला. हात फिरवताना त्याचं डोळं भरुन आलं होतं... आता काय मला जगायची इच्छा राहीली न्हाय... काय कुठंच समाधान न्हाई... जातो बाबा आता म्हणून गणपान जवळ पडलेला कासरा उचलला. गणपाची भाषा त्या मुक्या जनावरांना काय समजणार होती. ती गप् मुकाट्यानं टाकलेली वैरण खात होती. रात्र वाढू लागली होती. गणपानं वडाकडंच्या शेताचा रस्ता धरला व तो तडक चालू लागला. रातकीडयांची किरकिर ऐकू येत होती... मध्येच झाडामध्ये खुसपूसल्याचा आवाज येत होता. बाकी भयान शांतता होती. गणपा वडाच्या झाडाजवळ पोहचला. अंधार भुक्क पडला होता. डोळ्यात बोट घातलं तर दिसत नव्हतं. अंदाज घेत गणपा झाडावर चढत होता. मध्येच कासरा सावरत होता. आज त्यानं ठरवलंच होतं की, आज जगायचं नाही आणि एका फांदीला त्यानं कासरा घट्ट बांधला व कासर्‍याची दुसरी बाजू स्वत:च्या गळयामध्ये अडकवली व डोळं झाकून त्यानं उडी टाकली...
इकडं घरात शाली व सिद्दू म्हाताराही गणपा रूसून कुठंतरी गेला असं समजून गप् गार बसून होती. पण दौलू मात्र आईला म्हणत होता भाऊ कुठं गेलं बघ... पण कोणी याच्याकडं लक्ष देत नव्हतं. असं बराच वेळ गेला मग म्हातार्‍याला त्याची चिंता वाटू लागली.
“अगं बघ तर कुठं गेलाय त्यो...”
“आता मी कुठं अंधारात बघू...”
“अगं दौलूला बरोबर घे आणि बघून ये...”
“कुठं गेलाय कुणास ठाऊक...” म्हातारा मनाशी विचार करत होता….
शालीनं कंदील पेटवला व थोरली पोरगी निर्मला हिला बरोबर घेतलं. गोठ्याकडं जाऊन बघून आली पण कोणीच दिसत नव्हतं पाखर्‍या व सोन्या गुमानं वैरण खात होती. मग घराच्या पाठीमागील बाजूस जावून शेताकडं बघू लागली पण अंधारात कायबी दिसत नव्हतं. मग जवळच्या रानातनं पुढं वडाकडं जावून बघावं म्हणून त्या दोघी अंधारातनं पुढं चालत होत्या. मनात वेगळंच विचार येत होतं. वडाच्या झाडाजवळ पोहचताच कोणीतरी कण्हल्याचा आवाज येत होता. वर कंदील करून पाह्यलं तर गणपानं फास गळयात अडकवला होता पण त्याचं नशीब बलवत्तर होतं. त्यानं खाली उडी मारताना त्याची विजार फांदीच्या खोबर्‍यात अडकली होती. त्यामुळं त्याला वरही जाता येत नव्हतं व खाली ही येता येत नव्हतं. त्याला तसा बघताच पोरगी निर्मला रडायला लागली. एवढ्या रात्री कुणाला बोलवायची सोय नव्हती. फांदी तशी जास्त उंच नव्हती निर्मलानं डोळं पुसत-पुसत वर चढण्याचा प्रयत्न केला पण जमत नव्हतं. मग शालीनं जरा आधार दिला. तशी ती वर गेली गणपा बराच वेळ अडकल्यामुळं तो थकून गेला होता. शालीनं विळा निर्मलाच्या हातात दिला. बरं झालं होतं साप बीप असंल म्हणून शालीनं विळा बरोबर घेतला होता. विळयानं निर्मलानं कासरा वरून कापायला सुरूवात केली. गळयातला फास काढणं अवघड होतं त्यात अंधारात व्यवस्थित काही दिसत नव्हतं. वरचा कासरा तुटला तसा विजार अडकलेला खोंबराही मोडला तसा गणपा धपकन खाली पडला. त्याचबरोबर शालीचाही जीव भांडयात पडला. गणपा वाचला होता. शाली व निर्मला दोघी गणपाच्या गळयात पडून रडू लागल्या. गळयातला फास अजून तसाच होता. हळूच गणपानं तो सैल करुन काढला. तिघं बराचवेळ तिथं बसून होती. वेळचं भान कुणालाच नव्हतं. म्हातारा तिकडं काळजीनं बेजार झाला होता. मग काही वेळानं तिघंही घराकडं परतली. येताना शाली गणपाला म्हणाली, “चुकलंच माझं...”
गणपा गुमानं चालत होता. घराजवळ आल्याबरोबर तो पहिला गोठ्यात गेला व पाखर्‍या व सोन्याला गोंजारू लागला. वेळ चांगली होती आपली. त्याचं त्यालाच वाईट वाटू लागलं होतं. तो विचार करत होता. आपल्या माघारी काय झालं असतं... कोणी पाखर्‍याला वैरण टाकली असती. कोणी आपल्या पोरांना सांभाळलं असतं. सगळं काही आठवताच त्याच्या डोळयात पाणी दाटून आलं होतं. पाखर्‍याचं नशीब मात्र खरंच थोर होतं... म्हणूनच तर गणपाचं प्राण जायचं वाचलं होतं... म्हणतात ना! काळ आला होता... पण वेळ आली नव्हती...

आपल्या ही परिसरातील बातम्या, समस्या आणि लेख प्रसिध्दीसाठी सज्ज आहे आपल्या हक्काचं दमदार न्युज नेटवर्क युवाराज्य न्युज. यासाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावर संपर्क करा

30-Oct-2018Yuvarajya News Network
Top